प्राचीन काळापासून विविध सभ्यतांमध्ये सहसंबंध अस्तित्वात होते. त्यामुळे मानवाच्या सामाजिकीकरणातून उदयास आलेल्या राज्य या संकल्पने सोबतच आंतरराज्य संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हे संबंध राजकीय स्वरुपाचे होते. कालांतराने राष्ट्र-राज्य संकल्पनेच्या उदयानंतर या संबंधांना संस्थात्मक अधिष्ठाण प्राप्त झाले.
१७८९ साली जेरेमी बेंथम यांनी “प्रिन्सिपल ऑफ मोराल्स अँड लेेजिस्लेशन” (Principal of Morals and Legislation) या ग्रंथात सर्वप्रथम ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या शब्दाचा वापर केला. सुरुवातीला या विषयाच्या संदर्भात अत्यल्प चर्चा झाली, परंतु प्रथम महायुद्धाच्या नंतर या विषयाचे महत्व प्रचंड प्रमाणात वाढले. या विषयाचा स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून अभ्यास करण्यास खर्या अर्थाने द्वितीय महायुद्धानंतर सुरुवात झाली. त्या अगोदर आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन विषयाच्या प्रभावाखाली अभ्यासले जात होते.
प्राचीन काळात विविध सभ्यतामध्ये व्यापारी संबंध असल्याची इतिहासात नोंद आहे. जसे की, हडप्पा, चिनी, ग्रीक, रोमन, इजिप्शियन, इत्यादी सभ्यतांमध्ये हे संबंध आपल्याला दिसून येतात. तसेच प्राचीन काळातील कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आंतरराज्य संबंधांच्या संदर्भात विस्तृत वर्णन देखील करण्यात आले आहे. मध्ययुग आणि आधुनिक युगाला जोडणारा राजकीय विचारवंत आणि इटालियन राजदूत निकोलो मॅकियाव्हेलीच्या लिखाणात देखील आंतरराज्य संबंधांच्या संदर्भात मांडणी आढळून येते.
जागतिक पातळीवर आधुनिक राष्ट्र-राज्य प्रणालीला चालना खर्या अर्थाने १६४८ च्या वेस्टफालिया तहाने मिळाली. त्यामुळे आंतर जमातीय, आंतर नगरराजीय संबंधांना आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप प्राप्त झाले. या आंतरराष्ट्रीय संबंधांचा अर्थ त्यांची व्याप्ती आणि बदलते स्वरुप यासंबंधीचा अभ्यास या लेखात आपण करणार आहोत.
आंतरराष्ट्रीय संबंधांचा अर्थ
आंतरराष्ट्रीय संबंधांत भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान या अनुषंगाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्र-राज्यातील संबंध अभ्यासले जातात. हेन्स मॉग्रेथॉ यांना आंतरराष्ट्रीय संबंधाचे जनक मानले जाते. मॉग्रेथॉ आणि केलेथ थॉम्सन यांच्या ‘पॉलीटिकल्स अमंग नेशन्सः द स्ट्रगल फॉर पॉवर अॅड पिस’ या ग्रंथात आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात विस्तृत मांडणी करण्यात आली आहे.
दुसर्या महायुद्धा पर्यन्त आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाला परराष्ट्रधोरणाच्या अभ्यासापूर्ते मर्यादित करण्यात आले होते. परंतु पुढे त्यात राजकीय तसेच गैरराजकीय संबंधाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
व्याख्या
- मॉग्रेथॉ: आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये सत्ताप्राप्तीसाठी चाललेला संघर्ष होय.
- फेलिक्स ग्रास: आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाशी परस्पर पूरक आहे.
- जॉन पर्टोनः आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रीय हित साध्यता करण्यासाठीची तसेच संघर्ष टाळण्यासाठीची राष्ट्रा-राष्ट्रांतील सुसंवादाची व्यवस्था.
वरील व्याख्यामधून आपण असे म्हणू शकतो की, ‘जागतिक स्तरावरील विविध राष्ट्रांतर्गत देवाण-घेवाण, राष्ट्रांतील संघर्ष निवारण, राष्ट्रीय हित संबंधांच्या जतनाची प्रक्रिया आणि परराष्ट्र धोरणाचा समग्र अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध.’
आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरुप
आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप विस्तृत असून त्यात एकाच वेळी विविध आघाड्यांवर अनेक अभिकर्ते कार्य करत असतात. तसेच जागतिकीकरण आणि बदलत्या भुराजकीय परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संबंध ही गतीशील अभ्यास शाखा झाली आहे. कालानुरुप तिच्या स्वरुपात बदल होताना दिसतोय. ते बदल आपल्याला पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करता येतील.
- राष्ट्रवाद आणि सार्वभौम राष्ट्रे यांच्यातील स्पर्धा.
- राष्ट्रीय हितसंबंधः संघर्ष आणि संतुलन.
- जागतिक स्तरावर राष्ट्र-राज्यांची वाढणारी संख्या.
- राजनयन आणि युद्धाचा वापर.
- राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणांची वैशिष्टयातील स्थित्यंतरे.
- जागतिक समस्या/चिंताविषयी बदलते धोरण: दहशतवाद, पर्यावरण, ऊर्जा संकट, आण्विक-शस्त्रास्त्र स्पर्धा.
- राष्ट्र-राज्यांच्या संबंधातील स्थियंत्तरे.
- जागतिक संस्था, संघटना, गटे, आघाड्या, व्यासपीठे, इत्यादी.
- जागतिक नागरी समाज, दबाव गट, चळवळी इ.
- राष्ट्रांच्या शासनपद्धतीतील विचारप्रणालीत्मक द्वंद्व
- आंतरराष्ट्रीय राजकारणांची आयुधे
- राजनयनाचे बदलते स्वरुप – सांस्कृतिक राजनयन, ट्रॅक-टू राजनयन, डायस्पोरा राजनयन
आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरुपातील बदला मागील कारणे
- उत्तरवसाहतवाद व साम्राज्यवादाचा अंतः यामुळे नवीन राष्ट्र-राज्य उदयाला आलीत, पहिले युरोपीय राष्ट्रे आणि त्याच्या वसाहतीच्या संबंधाचे स्वरुप बदलून खर्या अर्थाचे राष्ट्र-राज्यांच्या संबंधाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले.
- लोकशाही शासनप्रणालीचा विस्तारः लोकशाही शासन प्रणालीतून येणार्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून राष्ट्र-राज्यात समन्वय वृद्धी होण्यास हातभार लागला. जागतिक व्यवस्थेच्या लोकशाहीकरणावर याचा सकारात्मक परिणाम होतांना दिसतोय.
- विचार प्रणालीतील संघर्षातील बदलः जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थांच्या स्वरुपासंदर्भात झालेली सामुहिक एकवाक्यता, तसेच अर्थकरणाचे झालेले जागतिकीकरण, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय वृद्धीस हातभार लागला आहे.
- महसत्ताचे राजकारण आणि शीतयुद्धकालीन व्यवस्था.
- जागतिक संस्थांची वाढती संख्या आणि जागतिक सहकार्य वृद्धी.
- तंत्रज्ञानात्मक प्रगती आणि त्यातुन निर्माण झालेली जागतिक पुरवठा साखळी.
- सामुदायिक जागतिक समस्यांचा उदय आणि त्यावरील सामुहिक उपाय योजनाची वाढलेली गरज उदा. दहशतवाद, पर्यावरण समस्या इत्यादी.
- आंतरराष्ट्रीय शासन सरचनेच्या प्रारुपातील वाढलेला विश्वास.
- जागतिक संघटनांचे वाढलेले जाळे.
- सामुहिक सुरक्षितता तसेच आर्थिक सहकार्याचे नवीन प्ररोधन तंत्र, AUKUS आणि क्वाडच्या माध्यमातून चीनच्या विस्तारवादी धोरणाला लगाम लावण्याचा प्रयत्न.
- जागतिकीकरणाच्या उपल्बधता आणि आव्हाने.
- जागतिक स्तरावर नव उजव्यांचा झालेला उदय.
- सुरक्षिततवादी विचारांचा प्रसार.
- कोविडोत्तर जग – सहकार्य आणि संघर्ष.
- राष्ट्रीय हितसंबंध केंद्रित उदारमतवादी राष्ट्रांची वृती – अमेरिका, इंग्लंड इत्यादी.
आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती
सुरुवातीला राष्ट्रीय सरकारामधील संबंधा पुरता मर्यादित असलेला विषय म्हणून आंतरराष्ट्रीय संंबंधाकडे बघण्यात आले. परंतु कालांतराने या विषयाचे अभ्यास क्षेत्र अधिक व्यापक होत गेले आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि स्वरुप यात सातत्याने बदल होतांना दिसत आहे. याच कारणाने आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती देखील वृद्धिगंत होतांना दिसते.
वैश्वीकरणाच्या प्रक्रियेतील बहुविविध घटकांचा आंतरराष्ट्रीय संबंधात समावेश झालेला आपल्या निदर्शनास येतो. तरी देखील अंतरराष्ट्रीय संबंधाच्या गतिशील प्रक्रियेत ‘राष्ट्र’ हेच घटित केंद्रस्थानी असल्याचे वारंवार अधोरेखित होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांची व्याप्ती खालील घटकांच्या अनुषंगाने अभ्यासता येऊ शकते.
- सार्वेभौम राज्यांमधील संबंध.
- परराष्ट्र धोरणाचा अभ्यास.
- राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचा अभ्यास.
- विचारप्रणालीचा अभ्यास.
- आंतरराष्ट्रीय राजकारणातील कळीचे मुद्दे.
- जागतिक व्यवस्थेसमोरील अव्हाने.
- आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना, गट, व्यासपीठांचा अभ्यास.
- जागतिक महासत्तांच्या राजकारणाचा अभ्यास.
- आंतरराष्ट्रीय कायदे, करार, तहांचा अभ्यास.
- जागतिक स्तरावरील मानवी समुदयाच्या संबंधांचा अभ्यास.
- ज्ञानात्मक देवाण-घेवाण व आंतरराष्ट्रीय सहकार्य.
- शस्त्रास्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरण प्रक्रिया.
- जागतिक सहकार्यातून सामुहिक विकासाची प्रक्रिया.
आंतरराष्ट्रीय संबंध एक विद्याशाखा
20 व्या शतकाच्या सुरूवातीस पाश्चिमात्य देशांत आणि विशेषतः अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संदर्भातील ज्ञानशाखा उदयास आली, कारण त्या देशाची शक्ती आणि प्रभाव वाढला. नव्याने स्थापन झालेल्या सोव्हिएत युनियनमध्ये आणि नंतर कम्युनिस्ट चीनमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास मार्क्सवादी विचारसरणीमुळे थांबला होता. तर पश्चिमेमध्ये हे क्षेत्र अनेक घटकांच्या परिणामांमुळे विकसित झाले. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे सामान्य शिक्षणामध्ये परराष्ट्र व्यवहारातील सूचनांचा समावेश असावा. तसेच हे ज्ञान अधिक सार्वजनिक नियंत्रण आणि परराष्ट्र व लष्करी धोरणांवर देखरेख ठेवण्याच्या हितासाठी प्रगत करावे, या कल्पनेला बळकटी मिळाली. हा नवा दृष्टीकोन अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन (1913-21) यांनी पहिल्या महायुद्धाच्या समझोत्या नंतर, महासत्ता मधील संबंधांसाठीच्या त्यांच्या कार्यक्रमात मांडला होता.
युद्धात झालेल्या विध्वंसामुळे राजकीय नेत्यांमधील विश्वास दृढ झाला की, आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल पुरेसे ज्ञान उपलब्ध नसल्याने, आपल्याला या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता या विषयांवर संशोधन आणि अध्यापन करण्याला चालना दिली पाहिजे. याचाच भाग म्हणून दोन महायुद्धांच्या दरम्यान 1920 च्या दशकात युरोप आणि उत्तर अमेरिकेत आंतरराष्ट्रीय संबंधांच्या शिक्षण आणि संशोधनासाठी वाहिलेली नवीन केंद्रे, संस्था, शाळा आणि विद्यापीठ विभाग तयार करण्यात आले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणाऱ्या खाजगी संस्थांची देखील कालांतराने स्थापना करण्यात आली.