युपीएससीने नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात 2013 साली आमूलाग्र बदल केला. त्या अगोदर दोन वैकल्पिक विषय असतांना प्रादेशिक भाषा, विशेषतः मराठी भाषा माध्यमातून परीक्षा देऊन निवड होणाऱ्या आणि पहिल्या 100 मध्ये येणार्या परीक्षार्थींची संख्या जास्त होती. कालांतराने बदलत्या पॅटर्न नुसार मराठी माध्यमातून दर्जेदार साहित्य निर्माण कमी झाले, तसेच जे तयार झाले ते सर्वांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे हळूहळू मराठी माध्यमातून निवड होणार्याची संख्या कमी झाली. त्यामुळे परीक्षार्थींनी देखील मराठी माध्यम घेणे कमी केले, परिणामी मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देणाऱ्यांची संख्या देखील कमी होत गेली. अर्थात UPSC पूर्व परीक्षांत झालेले बद्दल देखील त्याला कारणीभूत आहेत.
यासर्व परिस्थितीत मी स्वतः मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देत होतो. त्यावेळी मला आलेल्या समस्या पुन्हा कोणी मराठीत मुख्य परीक्षा लिहीत असतांना येऊ नये, या विचारातून UPSCinMarathi चा जन्म झाला. त्यामुळे आमचा मुख्य भर हा मराठी भाषेतून जास्तीतजास्त चांगले आणि परीक्षाभिमुक अभ्यास साहित्य निर्माण करणे, आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवणे यावर आहे. त्याचसाठी आपण या पोर्टलची निर्मिती केली आहे. योगायोगाने आता MPSC ने देखील राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम UPSC च्या धर्तीवर केला असून, वर्णनात्मक पॅटर्न लागु केले आहे. त्यामुळे अर्थातच आपल्या या UPSCinMarathi चा फायदा मराठी माध्यमातून राज्यसेवेची तयारी करणार्यांना देखील होणार आहे.
आजच्या काळात इंटरनेट आणि मोबाईल हे बहुतांश भागात पोहोचले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात राहणार्या परीक्षार्थींना या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे. या पोर्टल सोबतच आपण आपल्या YouTube चॅनेल वर आणि इतर समाज माध्यमांवर दर्जेदार साहित्य, चर्चा सत्र उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे तुम्ही तिकडे देखील आमच्याशी जोडले जा. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मराठी माध्यमातून परीक्षा देणारा एक जरी परीक्षार्थी UPSC नागरी सेवा परीक्षेत पहिल्या 100 मध्ये आली/आला, किंवा त्यांच्या या प्रवासात थोडातरी आमचा फायदा झाला, तरी आमचे ध्येय साध्य होईल!
– ज्ञानेश्वर जाधव आणि टीम UPSCinMarathi