संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission – UPSC) ही भारताच्या संविधानाने स्थापन केलेली एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. UPSC चा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारच्या विविध नागरी सेवांमध्ये नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे आणि योग्य उमेदवारांची निवड करणे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
UPSC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी ‘पब्लिक सर्विस कमिशन’ म्हणून झाली. सुरुवातीला ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या या संस्थेचे कार्य मर्यादित होते. नंतर, 1935 च्या भारत सरकार अधिनियमांतर्गत याला ‘फेडरल पब्लिक सर्विस कमिशन’ असे नाव देण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, 26 जानेवारी 1950 रोजी या आयोगाचे ‘संघ लोक सेवा आयोग’ (UPSC) असे नामकरण करण्यात आले आणि त्याला पूर्णपणे स्वायत्त दर्जा देण्यात आलाय.
घटनात्मक तरतुदी
UPSC च्या स्थापना आणि कार्यपद्धतीसंबंधीची तरतुदी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 ते 323 मध्ये समाविष्ट आहेत. या तरतुदींमध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे:
- आयोगाची स्थापना (अनुच्छेद 315) – भारतात संघ लोक सेवा आयोग आणि राज्य लोक सेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद.
- सदस्यांची नियुक्ती (अनुच्छेद 316) – आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतील.
- कार्यकाळ (अनुच्छेद 317) – आयोगाच्या सदस्यांचे कार्यकाळ, सेवा-अटी आणि त्यांना पदावरून काढण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.
- कार्य आणि जबाबदाऱ्या (अनुच्छेद 320) – आयोगाच्या प्रमुख कार्यांमध्ये नागरी सेवा परीक्षा घेणे, निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवणे, केंद्र सरकारला भरतीसंबंधी सल्ला देणे आणि शिस्तभंगाच्या बाबींमध्ये मार्गदर्शन करणे यांचा समावेश आहे.
- वार्षिक अहवाल (अनुच्छेद 323) – आयोगाला दरवर्षी आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करावा लागतो आणि तो अहवाल संसदेत मांडला जातो.
UPSC ची प्रमुख कार्ये
UPSC देशभरात विविध प्रकारच्या नागरी सेवा आणि संरक्षण सेवांसाठी परीक्षा आयोजित करते. यामध्ये खालील स्पर्धा परीक्षा प्रामुख्याने घेतल्या जातात:
- भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
- भारतीय पोलीस सेवा (IPS)
- भारतीय विदेश सेवा (IFS)
- भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES)
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF)
- राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा
- संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा (CMS)
- भारतीय वन सेवा परीक्षा (IFS)
- केंद्रीय सेवा
- केंद्रशासित प्रदेश नागरी आणि पोलीस सेवा
UPSC आयोगा मार्फत घेण्यात येणार्यां परीक्षा भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आणि कठीण पातळी असलेल्या परीक्षा असून, त्या परीक्षा देशातील प्रशासकीय व्यवस्थेसाठी सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आयोगाची कार्यपद्धती पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्ताधारित असून, भारताच्या लोकशाही प्रशासनात महत्त्वाची भूमिका आयोग बजावतो.