AI चे स्वरूप आणि त्यातील तफावत
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आधुनिक जगातील एक प्रभावी साधन बनले आहे, मात्र त्यातील नैतिकतेची (Ethics) तफावत सातत्याने जाणवत आहे. विशेषतः AI च्या उत्तरांमधील बदलत्या स्वरूपामुळे आणि त्याच्या मुळातच असलेल्या “Conformity” (अनुरूपता) तत्त्वामुळे त्याचा उपयोग कसा केला जातो, यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित होतात.
गेल्या काही काळात Grok आणि ChatGPT या दोन AI प्रणालींच्या कार्यपद्धतीतील फरक प्रकर्षाने समोर आला आहे. Grok हे उपलब्ध डेटावर कार्य करते, मात्र ते ठराविक नीतिमूल्यांवर (Ethical Frameworks) आधारलेले नाही. याउलट, ChatGPT वैश्विक नैतिक दृष्टिकोनातून उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच GPT अधिक संतुलित आणि “Conformity” आधारित उत्तरे देते, तर Grok कधी कधी अधिक स्पष्ट व कठोर भूमिका घेते.
Grok ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ते समाज माध्यमांवरील (विशेषतः X) लोकप्रिय असलेल्या संकल्पनांवर आधारित उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. यामुळे ती उत्तरे वेळोवेळी पूर्वग्रहदूषित किंवा अनियमित वाटू शकतात. त्याच्या तुलनेत GPT अधिक संरचित विचारपद्धतीने कार्य करते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात “अनुरूपता” (Conformity) म्हणजे एखादी AI प्रणाली प्रस्थापित नियम, नियमावली आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे किती प्रमाणात पालन करते. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो:
- कायदेशीर अनुपालन (Regulatory Compliance) – AI प्रणाली जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) किंवा EU AI कायदा यांसारख्या कायदेशीर चौकटींचे पालन करत असल्याची खात्री करणे.
- नैतिक मानके (Ethical Standards) – AI प्रणाली निष्पक्षता, पारदर्शकता आणि जबाबदारी यांसारख्या नैतिक तत्त्वांचे पालन पालन करत असल्याची खात्री करणे.
- तांत्रिक सुसंगती (Technical Consistency) – AI प्रणाली विश्वासार्ह, पूर्वानुमान करण्याजोगे आणि पूर्वग्रहमुक्त परिणाम देते का तपासणे.
- सामाजिक अनुकूलता (Social Adaptation) – AI प्रणाली समाजाच्या अपेक्षा आणि मानवी मूल्यांशी जुळवून घेते का तपासणे.
AI संवादातील भाषिक व सामाजिक प्रभाव
Grok आणि GPT यामधील आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांच्या संवादाची पद्धत. उदाहरणार्थ, Grok ला जर भारतीय भाषेत प्रश्न विचारले, विशेषतः अनौपचारिक (casual) किंवा कठोर भाषेत, तर तो देखील तशाच भाषेत उत्तर देतो. शिवीगाळ किंवा असभ्य भाषा वापरल्यास, त्याच्या प्रतिक्रियाही त्याच प्रकारच्या असतात. याउलट, GPT कठोर नैतिक संहितांवर (Ethical Standards) आधारित असल्याने तो अधिक नियंत्रित आणि सुसंवादी उत्तरं देतो.
AI चा गैरवापर आणि संभाव्य धोके
AI ची विश्वासार्हता ही एक महत्त्वाची समस्या आहे. Grok हे तुलनेने अधिक “Rigid” (अविचल) असते, म्हणजेच ते काही विशिष्ट मुद्द्यांवर ठाम भूमिका घेते आणि तीच योग्य असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र वापरकर्त्यावर टाकते. याउलट, GPT अधिक मुत्सद्दी (diplomatic) उत्तरं देते आणि ते संतुलित संवाद साधण्याचा प्रयत्न करते.
याचा एक संभाव्य धोका असा आहे की Grok ला पूर्वग्रहदूषित विचार शिकवणे तुलनेने सोपे आहे, कारण ते ज्या डेटावर आधारित आहे, तो अनेकदा सामान्य लोकांनी निर्माण केलेला असतो. GPT मात्र या बाबतीत अधिक काटेकोर राहतो, कारण ती एक ठोस नैतिक चौकट (Ethical Framework) वापरते.
निष्कर्ष
Grok आणि GPT या दोन्ही प्रणाली सत्यशोधन करणाऱ्या किंवा अंतिम सत्य मांडणाऱ्या नाहीत. त्यांचा उपयोग केवळ स्वतःच्या मतांना दुजोरा मिळावा यासाठी करणे हा सर्वांत मोठा धोका आहे. सत्य ही एकसंध गोष्ट नसून त्याला अनेक पैलू असतात. त्यामुळे AI वर अंधविश्वास ठेवणे किंवा त्याच्या उत्तरांना अंतिम सत्य मानणे चुकीचे ठरेल.
याच पार्श्वभूमीवर, AI आणि नैतिकता यामधील संबंध अधिक गुंतागुंतीचा होत आहे. भविष्यात, AI ला केवळ डेटा प्रक्रियेसाठी नव्हे, तर सामाजिक आणि नैतिक संकल्पनांसोबत देखील जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे AI आधारित चॅटबॉट्सच्या सत्यतेविषयी अधिक सखोल अभ्यास आणि सतत पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे.