नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 आणि पुढे…

  • प्रश्नांची काठिण्य पातळी पेक्षा प्रश्न समजून घेणे आणि त्यावर आधारित माहिती लक्षात घेऊन उत्तर सोडविणे वेळ खाऊ झाले आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन कठीण झाले आहे. (विशेषतः मराठी आणि इतर प्रादेशिक माध्यमातून परीक्षा देणार्‍या साठी हे आणखी कठीण आहे.)
  • चालू घडामोडी साठी नियमित पेपर वाचन त्यातील महत्त्वाच्या घडामोडींच्या बाबतीत चौकस राहणे गरजेचे आहे.
  • राज्यशास्त्र (Polity), इतिहास आणि भूगोल या सारख्या विषयांत कमीत कमी चुका करणे अनिवार्य झाले आहे.
  • अर्थशास्त्र, पर्यावरण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या संदर्भात अभ्यास करतांना चालू घडामोडी केंद्रित अभ्यास करणे अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथम थेअरी समजून घेणे गरजेचे आहे.
  • कठिण पातळी आणि वेळ खाऊ पेपर याच्या चक्रव्यूहाला जो भेदेल तोच पात्र ठरेल, अशी परिस्थिती आहे.
  • गणित आणि बुद्धिमत्ता सेक्शन मध्ये प्रश्नाचे उत्तर काढण्यापेक्षा, काय असल्यावर उत्तर निघेल हे माहीत असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि पायाभूत गणिती नियम जाणून घेणे अनिवार्य झाले आहे.
  • आकलनाच्या प्रश्नांत assumption (गृहीतक) शोधणे ही जिकिरीची बाब ठरत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराच्या प्रश्नांत जास्त चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यासाठी प्रचंड सराव (UPSC च्या अधिकृत उत्तरतालिकेला डोळ्यासमोर ठेवून) करणे गरजेचे आहे.
  • कोणत्याही क्लासच्या किंवा इतर Telegram चॅनेलवर येणार्‍या उत्तरतालिका बघून गुण काढू नये. कारण तसही UPSC 15 दिवसांच्या आसपास वेळ घेऊन निकाल लावते. त्यामुळे हा कालावधी वाया जाऊ नये, असे वाटत असल्यास 1-2 दिवसांच्या गॅपने मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी.
  • जर यावेळी पूर्व परीक्षा निघाली तर हे 15 दिवस तुम्हाला edge मिळवून देतील, आणि दुर्दैवाने नाही निकाल आला तरी Mains चांगली करून ठेवणे कधीही चांगलेच. जेणे करून जेव्हाही पूर्व परीक्षा निघाली, तेव्हा तुमची निवड निश्चित झाली पाहिजे. निकालाच्या नंतर आपण यावर आणखी विस्तृत बोलूच की नेमके पुढचे नियोजन काय करता येईल.
  • तुम्ही कोणत्याही माध्यमातून मुख्य परीक्षा देत असलात तरी इंग्रजी किंवा हिंदीवर तुम्हाला पकड मिळवणे गरजेचे आहे. कारण पूर्व परीक्षेचा अडथळा पार करण्यासाठी ही भाषिक पकड अत्यंत कळीची ठरत आहे. नियमित पेपर वाचन यासाठी फायद्याचे ठरेल.
  • पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या मागील वर्षांच्या पेपरचे योग्य विश्लेषण स्वतःच्याच पातळीवर करून घेणे अत्यावश्यक आहे, त्यावर जास्तीत जास्त भर विद्यार्थ्यांनी द्यावा. यासाठी आपल्याला मागील वर्षाचे सर्व पेपर आपल्या वेबसाईटवर मिळतील.
  • आता पूर्व परीक्षा अवघड गेली म्हणुन लगेच तिची तयारी न करता, जानेवारी पर्यंत मुख्य परीक्षेची तयारी करण्यावर भर देण्यात यावा. त्यात देखील जे घटक फक्त मुख्य परीक्षेला महत्वाचे आहेत, त्यावर भर देण्यात यावा. वैकल्पिक विषयांच्या संदर्भात देखील जवळपास सर्व घटक पूर्णपणे वाचून झाले पाहिजेत. तसेच शॉर्ट नोट्स देखील बनवून घेतल्या पाहिजेत. जेणे करून पूर्व परीक्षा झाल्यावर त्या वाचून उत्तर लेखन सराव करता येईल.